करडी(पालोरा) : आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२० पासूनचे आजपर्यंतचे वेतन झालेले नाही. आदिवासी आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त खावटीचे काम सोपविल्याने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांत असंतोषाची भावना आहे.
भंडारा जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत अनुदानित आश्रमशाळांची संख्या सहा आहे. शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या माेठी आहे. कोरोनापासून आश्रमशाळा बंद असल्यातरी कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन कार्य सुरू होते; परंतु या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतन मिळालेले नाही. वेतन मिळालेले नसताना शासन व प्रकल्प कार्यालयाने उपासमारीचे संकट घोंगावत असलेल्या कर्मचाऱ्यांना आदिवासी नागरिकांना वाटप करावयाच्या खावटीच्या कामाला जुंपले आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत असंषोत व्यक्त होत आहे.