भंडारा: आदिवासी समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, अनेक प्रकरणात कारवाईला विलंब, पिळवणूक, फसवणूक आणि गळचेपीच्या निषेधार्थ आदिवासी समाज संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून दोन दिवसीय उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला. आदिवासी प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता मालडोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या बारव्हा आरोग्य केंद्राच्या डॉ. गुलाब कापगते यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करू नये, भंडारा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वर्धा येथे स्थानांतरित करू नये, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय आदिवासी नोकरभरती करू नये, आदिवासींना जमिनीचे पट्टे आणि ७/१२ उतारे देण्यात यावे, आदिवासी समाजाला सांस्कृतिक भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंडपाला खा. पटोले यांनी भेट देऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आ. संजय पुराम, आ. डॉ. देवराम होळी, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, दिलीप मडावी, सभापती नीलकंठ टेकाम, बी. एस. सयाम, संजय मडावी, बबन कोळवते, जि.प.सदस्य उत्तम कळपते, ऋषी इनवाते, राजू सयाम, नारायण वरठे, प्रा. मधुकर उईके, गणपत मडावी, अजाबराव चिचामे, मंसाराम मडावी, वंदना पंधरे, मनोरथा जांभुळे, दामाजी मडावी, भाऊराव कुंभरे, अर्जुन मरस्कोल्हे, अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, लक्ष्मण उईके, किरण कुंभरे, प्रभा पेंदाम, वर्षा धुर्वे, रजनी आत्राम, भुमाला कुंभरे, सोमा खंडाले यांच्या नेतृत्वात दसरा मैदानातून मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात पोलिसांच्या अकार्यक्षतेवर घोषणाबाजी करण्यात आली. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यात डॉ. कापगते यांच्यावर अद्यापही कारवाई न झाल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
आदिवासी समाजाचा मोर्चा
By admin | Published: October 08, 2015 12:27 AM