जीव धोक्यात : वसतिगृह इमारतीचा ताबा मिळण्याकरिता धडपडतुमसर : तीन वर्षापुर्वी मंजुर झालेल्या आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहाच्या ईमारतीचे संथ गतीने काम सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून जीर्ण झालेल्या ईमारतीत रहावे लागत आहे. कोणत्याही अनुचित प्रकार घडू शकतो. निर्माणाधीन शासकीय वसतिगृहाचे बांधकाम त्वरित पूर्ण करून इमारतीचा ताबा मिळावा, याकरिता तालुक्यातील आदिवासी बांधवांनी २४ जूनला नवीन इमारतीसमोर धरणे आंदोलनाला सुरूवात केली. आदिवासीयांना समाजाच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शासनाने तालुकास्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरू केले. वसतिगृह इमारतीचे नवीन बांधकाम व्हावे याकरिता पाठपुरावा झाला व अखेर दोन कोटी रूपये इमारत बांधकामाकरिता मंजुर झाले. मात्र शासनामार्फत टप्प्याटप्प्याने मिळत असलेल्या निधीमुळे बांधकाम संथ गतीने सुरू झाला व तीन वर्ष होऊन गेले. बांधकाम पूर्ण होत नसल्यामुळे वसतिगृहाचा ताबा मिळणे कठीण झाले. परिणामी खासगी व जीर्ण झालेल्या इमारतीत आदिवासी मुला-मुलींना जीव धोक्यात घालून वसतिगृहात राहावे लागत आहे. भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आदिवासी संघटना एकवटल्या व सामूहिकरीत्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र त्याची साधी दखलही घेतली नाही. आदिवासी धरणे देणार असा इशाराही दिला, परंतु शिष्टाचार म्हणून आदिवासीयांना चर्चेलाही बोलाविण्यात आले नाही. यावरून आदिवासींची पिळवणूक होत असल्याचे दिसून येते. विभागाचा तसेच शासनाचा निषेध नोंदवत वसतिगृहाच्या इमारतीचे त्वरित बांधकाम पूर्ण करून ताबा मिळावा याकरिता आदिवासी यांनी धरणे दिले. यावेळी आदिवासी नेते अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, दिनेश मरस्कोल्हे, विकास मरस्कोल्हे, विजय नैताम, सुभाष धुर्वे, हरीदास नैताम, राजकुमार वाढीवे, दुर्गा परतेती, नरेंद्र मडावी, संजय सरसकोल्हे व अन्य बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आदिवासींची धरणे
By admin | Published: June 25, 2016 12:28 AM