दारिद्र्यावर केली मात : पवनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलापवनी : अठरा विश्वे दारिद्र्य असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही अशा अत्यंत मजूरवर्गीय मागास कुटुंबात जन्माला आलेली त्रिवेणी शिवशंकर वाकडीकर जिद्द चिकाटी व परिश्रमाचे भरवशावर दिवाणी न्यायाधिशाची परिक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधिश झाली आहे.स्थानिक बाजार चौकात मोडक्या चाळीत वडील शिवशंकर वाकडीवर यांचे चप्पल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. परंतू व्यवसाय चालत नाही म्हणून पत्नी प्रतिभा वाकडीकर यांनासोबत घेवून ते मिरची सातऱ्यावर मिरचींचे देठ खुडून साफ करण्याची मजुरी करीत आहेत. जास्तीत जास्त काम झाले पाहिजे यासाठी शिक्षण घेणाऱ्या मुली-मुलांना सुटीच्या वेळात मिरची देठ खुडायला घेवून जात असतात अशी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती नजरेसमोर ठेवून त्रिवेणीने विकास विद्यालय पवनी येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण नंतर कला शाखेची पदवी घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मधुन एलएलबी व नंतर एलएलएम पूर्ण केले. दरम्यान एल.एल.एम. अंतिम वर्षाला असतांना दिवाणी न्यायाधिश पदाची जाहिरात पाहून स्पर्धा परिक्षा दिली. २७ मार्चला घोषित झालेल्या निकालात १३१ पैकी ५४ व्या स्थानावर राहून त्रिवेणीने भंडारा जिल्ह्यात एकमेव उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. आई-वडीलांचे सहकार्य, अॅड.रामचंद्र अवसरे यांचे मार्गदर्शन व स्वत:चे परिश्रम पणाला लावून त्रिवेणीने पवनी नगराचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पवनीतील ती पहिली न्यायाधीश ठरली आहे. (तालुका प्रतिनिधी)
गरिबीवर मात करून त्रिवेणी झाली न्यायाधीश
By admin | Published: April 07, 2017 12:34 AM