वसाहतीत लागले वर्कशॉप : नगरपालिकेच्या परवानगीवर नागरिकांचा आक्षेपतुमसर : स्थानिक इंदिरा व विनोबा भावे नगरातील शांतताप्रिय वसाहतीमध्ये स्टील फेब्रीकेशनचे वर्कशॉप उघडले गेल्याने वसाहतीमधली शांतता भंग झाली आहे. सकाळपासून ते दुकान बंद होईपर्यंत कर्कश आवाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबद तक्रार देऊनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. कुबेर नगरी समजल्या जाणाऱ्या तुमसर शहराचे 'हार्ट आॅफ द सिटी' म्हणून इंदिरा तसेच विनोबा भावे नगराकडे पाहिले जाते. पंरतू नेमक्या याच व दाट लोकवस्तीच्या भागात नगरपालिकेने स्टिल फेब्रीकेशन वर्क शॉप उघडण्याकरिता परवानगी दिली. त्यानुसार वर्कशॉपच्या मालकांनी आपली दुकानदारी लोकवस्तीत थाटली. त्यामुळे वर्कशॉपमधून जिवघेणे कर्कश आवाज येतो. त्या असहनिय आवाजामुळे तिथे राहणाऱ्या आबालवृध्दांची झोपमोड झाली आहे. आजारी रुग्णांना आराम मिळेनासे झाले. आवाजामुळेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुर्लक्ष झाले असून परिक्षेवरही त्याचा विपरित परिणाम झाल्याचे बघावयास मिळत आहे. सदर वर्क शॉप हा खाजगी मालकीच्या दुकान गाळ्यात सुरु आहे. त्या वर्कशॉपमुळे इतरही दुकानांना त्रास होत असल्यामुळे भिंत व तारेची कुंपने त्यांनी केली. लोकवस्ती असलेल्या ठिकाणी अशाप्रकारच्या वर्कशॉपला नगरपालिकेने परवानगी का दिली? हे समजण्यापलीकडेच आहे. मात्र त्रस्त जनतेने गत महिन्यात निवेदन देवून ती परवानगी रद्द करुन दुकान इतरत्र हलविण्याची मागणी केली होती. परंतू अजूनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.परिक्षेचे दिवस सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांचा भविष्य अंधकारमय झाला असून याकडे नगराध्यक्षांनी जातीने लक्ष घालावा, अन्यथा नागरिकातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा खणखणीत इशारा धनंजय गभणे यांच्यासह वसाहतीतील कुटूंबानी दिला आहे. आता तुमसर नगर पालिका प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)
भर वस्तीत ध्वनी प्रदृूषणाचा त्रास
By admin | Published: March 06, 2017 12:20 AM