लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचे अचानक डिझेल संपले आणि तब्ब्ल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाजवळ गुरुवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या प्रकाराने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाहतूक शाखेने धावपळ करत ट्रकला डिझेल पुरविले आणि महत्तप्रयासाने सुरू झाली. भंडारा शहराजवळील कारधा लहान पुलावरील वाहतूक बॅक वॉटरमुळे वाढ झाल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या पुलावरून सर्व वाहतूक गत दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची कायम भीती असते. शुक्रवारी साकोलीकडून एक ट्रक रात्री नागपूरकडे जात होता. मात्र वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ राष्ट्रीय महार्गावर या ट्रकमधील डिझेल संपले. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमध उभा झाला. आजूबाजूने जायला जागा नसल्याने वाहतूक ठप्प झाली. काही वेळातच दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक शाखेला माहिती मिळताच तात्काळ त्यांनी धाव घेतली. ट्रकला डिझेल पुरवून ट्रक सुरू केला. परंतु तोपर्यंत पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रवाशांना मनस्ताप- अनेक कंटेनर, ट्रक, कार, ट्रॅक्टर यांसह मोठ्या प्रमाणात दुचाकी होत्या. ही वाहतूक सुरळीत करायला तब्बल दोन तास लागले. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वैनगंगा पुलावर असे प्रकार नेहमीच घडत असून, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. त्याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी भंडारा शहरातील नागरिकांनी केली आहे.