किडींचा प्रादुर्भाव : पावसाची हजेरी समाधानकारक, अनुदानावर कीटकनाशकांची मागणीपालांदूर : खरीपाच्या आरंभाला वरूणराजाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने हलके धान अंतिम टप्प्यात असून भारी धान गर्भात आहे. पावसाचे व्यत्यय टळले असून ढगाळ वातावरणाने व उष्णतेने धानावर तुडतुडा, करपा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियंत्रणाकरीता बळीराजा सरसावला असून महागड्या कीटकनाशकामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. वास्तव परिस्थितीचा अभ्यास पुस्त शासन प्रशासनाने अनुदानावर किटकनाशक उपलब्ध करून देण्याची मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनीचे संचालक वसंत शेळके यांनी केली आहे. हातात आलेले धानपिक जाण्याच्या धास्तीने शेतकरी महागड्या किटकनाशकांचा उपयोग करित आहे. मागील वर्षाला पंचायत समिती लाखनी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय पालांदूर येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधी पुरविण्यात आली होती. यामुळे महागाईच्या चक्रातून पुरेसा दिलासा मिळाला होता. मागील वर्षी कोरड्या हवामानामुळे किडीचा प्रादूर्भाव अत्यल्प होता, तरीही अनुदानावर किटकनाशक उपलब्ध झाले. यावर्षाला किडीचा जोरदार प्रहार पिकावर असूनही शासन प्रशासन सकारात्मक धोरण न ठेवल्याने बळीराजा पुरता आर्थिक संकटात आला आहे. पाऊस थांबला व ऊन निघाली तर १५ दिवसात जिल्ह्याच्या काही भागात हलक्या धानाची कापणी व मळणीला आरंभ होऊ शकतो. शेतकऱ्यांनी तात्पुरत्या अडचणी करीता धान व्यापाऱ्याला न विकता थोडसा धीर ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा हमीभाव केंद्रावरच विकावे असे आवाहन वसंत शेळके यांनी केले आहे.धान पिकाच्या रक्षणाकरीता व अपेक्षित उत्पन्नाकरिता अळीच्या नियंत्रणाकरीता रासायनिक औषधीत ‘लॅम्बडा, क्लोरो, सायफस क्विनालफॉस’ तर तुळतुळ्याच्या चक्रातून मोकळे होण्याकरीता ‘इमिडा, बुप्रोबेंझीन, अंसाटोप’ यासारखी किटकनाशकांचा वापर सुरू आहे. कृषिमंडळ कार्यालयात जैविक किटकनाशकांचा साठा आला असून त्याचा उपयोग अत्यल्प होत असल्याने शासनाचा निधी कंत्राटदाराच्या घशात गेल्याची चर्चा आहे. यावेळी मागील वर्षीचे किटकनाशक मिळाले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. अधिकाऱ्यांनाही वास्तव कळते पण नाईलाजाने विरोध करता येत नाही. आज कित्येक शेतकऱ्यांच्या घरी जैविक औषधे विना वापराने निरूपयोगी आहेत. या वर्षाला करपा, कडाकरपाने अधिकच जोर धरला आहे. तीन वेळा फवारणी करूनही धानपिक बाधित होत आहे. करप्याच्या नियंत्रणाकरीता शेतकरी बुरशीनाक फवारणी करित असल्याचे दृश्य जिल्हाभर दिसतआहे. (वार्ताहर)
धान पिकावर तुडतुडा, करपा
By admin | Published: September 23, 2015 12:50 AM