मनसर ते गोंदियादरम्यान राष्ट्रीय महामार्ग बांधकामाला सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाने सिमेंट रस्त्याचे आयुष्य ६० ते ७० वर्षे इतके राहाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग सिमेंटीकरण करण्याला वेग आला. कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. आता सिमेंट रस्त्याला तडे जात असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. डांबरी रस्त्यावर मेंटेनन्सचा खर्च वारंवार करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्ग सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिमेंट रस्त्याचेसुद्धा एका वर्षातच तडे जात असल्याने मेंटेनन्स करावे लागत आहे.
सदर सिमेंट रस्ता बांधकाम भर उन्हाळ्यात करण्यात आले होते. रस्ता रस्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. येथे रस्त्यावर पोती ओली करून त्यावर पाणी टाकण्यात आले होते. पाण्याच्या कमतरतेमुळे सिमेंट रस्ता निकृष्ट तयार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या महामार्गावर फारसी वाहतूक नाही. या रस्त्यावर वाहतुकीचा भार अधिक असता तर सदर रस्त्याची दुरवस्था अधिक होण्याची शक्यता असती.