कधी पावसामुळे तर कधी पावसाअभावी शेतीचे नुकसान होते. याही परिस्थितीत शेतकरी शेती करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करतो. साकोली तालुक्यात रोजगाराच्या व इतर संधी उपलब्ध नसल्याने पारंपरिक शेती व्यवसाय सुरू आहे; मात्र या शेतीला लागणारा मुख्य घटक म्हणजे पाणी तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा बोरवेल आहेत, त्या शेतकऱ्यांना फक्त आठ तासाच्या भरवशावर शेती पिकवावी लागते. यासाठी शेतकऱ्यांनी बरेचदा आंदोलने, मोर्चे काढली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपयोग झाला तो फक्त काही महिन्यासाठीच.
सध्या साकोली तालुक्यातील गावात १६ तासांचे भारनियमन आहे. त्यामुळे कृषीपंपांना फक्त ८ तासच वीज पुरवठा मिळतो आहे; मात्र शेतशिवारातील डीपी या बिघाड अवस्थेतच आहे. त्यामुळे आठ तासातूनही चार पाच तासच वीज पुरवठा मिळतो. त्यामुळे पाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असते. पावसाळ्यात कसेबसे निभतेही; मात्र उन्हाळ्यात शेतीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो; मात्र या वस्तुस्थितीकडे ना अधिकाऱ्यांचे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे.
बॉक्स
सिंचन प्रकल्प कधी पूर्ण होणार!
साकोली तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प आहेत. यात चलंबंध नदीवर निम्नचुलबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असले तरी हा प्रकल्प अजूनपर्यंत शेतीच्या कामात येत नाही. दुसरा प्रकल्प भीमलकसा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी या प्रकल्पातून पाणी जाण्यासाठी नाल्याचे काम अपूर्णच आहे. तर तिसरा प्रकल्प म्हणजे घानोड येथील. या प्रकल्पाला वनजमिनीचे ग्रहण लागले असून, आताही हा प्रकल्प वन कायद्यातच अडकलेला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प कामाचा नाही.
बॉक्स
वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
साकोली तालुक्यातील शेतशिवारात लावण्यात आलेल्या विजेच्या डीपी या मोठ्या प्रमाणात खराब अवस्थेत आहेत. वारंवार तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे या डीपी दुरुस्ती होत नाहीत. परिणामी, आता याऐवजी चार पाच तासच वीज पुरवठा मिळतो.
बॉक्स
शेतकरीच करतात डीपी दुरुस्ती
बऱ्याचअंशी डीपीतील फ्युज तुटण्याच्या तक्रारी आहेत. यासाठी लाइनमन यांना फोन केला जातो. हे लाइनमन कधी फोन उचलतात, कधी उचलत नाही. उचललाही तर उलट सुलट बोलून टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकरीच डीपीचे फ्युज टाकून लाइन सुरू करतात. एखादवेळी काही धोका झाल्यास जबाबदारी कुणाची!