भंडारा : आईने सिनेमा पाहायला नागपूर येथे जाण्यास मनाई केल्याने झालेल्या वादात रागाच्या भरात बाराव्या वर्गातील विद्यार्थ्याने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी पुढे आले. मंगळवारी सकाळी वैनगंगा नदीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो नागपूर जिल्ह्यातील तांडा येथील असल्याचे उघड झाले.
श्रेयस गोवर्धन डहाट (१७) रा. तांडा, ता. मौदा असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याच्या आईने हा आपला श्रेयसच असल्याची ओळख पटविली. श्रेयस हा नागपूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेला शिकत होता.
सध्या त्याची परीक्षा सुरू असून एक पेपर व्हायचा आहे. त्याची आई भंडारा येथे आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी दोन महिन्यांपासून आहे. सोमवारी दुपारी श्रेयस भंडारा येथे आपल्या बहिणीकडे आला. नागपूरला सिनेमा पाहायला जायचे आहे, असे त्याने आपल्या आईला सांगितले. मात्र आईने नागपूरला जाण्यास मनाई केली. त्यामुळे त्याने आईसोबत वाद घातला आणि घरून निघून गेला. सायंकाळी तो परत आला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजता वैनगंगा नदीत एक मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह श्रेयसचा असल्याची ओळख पटली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रेयस होता रागीट स्वभावाचा
बाराव्या वर्गात शिकणारा श्रेयस हा रागीट स्वभावाचा होता. अनेकदा तो क्षुल्लक कारणावरून वाद घालत होता. यापूर्वीही तो घरून तीन-चारदा निघून गेला होता. त्यामुळेच सोमवारी घरून निघून गेल्यावर घरच्यांनी फारसे मनावर घेतले नाही. मात्र यावेळी त्याने वैनगंगेत उडी घेऊन जीवनयात्राच संपविली.