शुक्रवार, १२ फेब्रुवारी राेजी १० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, या सभांमध्ये सरपंच, उपसरपंचपदाच्या उमेदवारांची निवड केली जाईल. यात आज घेण्यात येणाऱ्या उसगाव, चांदोरी, पळसपाणी, धानोड, आमगाव बुज., उमरझरी, खैरी वलमाझरी, बोरगाव, परसटोला व खांबा या गावांचा समावेश असून, प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
साकोली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच घेण्यात आल्या. निवडणुकांचे निकालही जाहीर करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २०२० ते २०२५ या कालावधीकरिता साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचाचे प्रवर्गनिहाय आरक्षण काढत मागील आठवड्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम राबविला जात असल्यामुळे गावोगावी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार १२ फेब्रुवारीला १० ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात येणार आहेत. त्यानंतर शनिवार व रविवारची सुटी आहे. त्यामुळे उर्वरित १० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड ही सोमवार, १५ फेब्रुवारी राेजी होणार आहे. यात मोखे, विर्शी, उकारा, चारगाव, बाम्हणी, धर्मापुरी, शिवणीबांध, साखरा, कटंगधरा व बोळदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.