निवारा हिरावला : भ्रमणध्वनी लहरींचा फटका, रासायनिक पदार्थांचा परिणामभंडारा : चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव आणि पक्ष्यांच्या थव्यांचा किलबिलाट सिमेंटच्या जंगलामध्ये हरविला आहे. चिऊ-काऊची ओळख पुस्तकातील चित्रावरूनच करून देण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. शिवाय भ्रमणध्वनीच्या लहरींमुळेही पक्ष्यांचा किलबिलाट थांबत असल्याचे सांगितले जात आहे. शहरी भागातील मोठमोठी वृक्ष विकासाच्या नावाखाली कापली जात आहे. रस्त्यावर अपवादानेही सावली सापडत नाही. कधीकाळी अशाच झाडांवर घरटी करून राहणाऱ्या पक्ष्यांचा निवारा हरविला आहे. आता तर जिकडे तिकडे सिमेंटची जंगलं वाढली आहे. घराच्या आवारात जी काही फुलझाडं आणि लहान वृक्ष असतील तेवढीच वृक्ष संपदा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे पक्ष्यांशी नातं जपणाऱ्यांची संख्याही दुर्मिळ झाली आहे. घराच्या अंगणात तांदळाचे दाणे टाकणारे अपवादानेच सापडतात. चिमण्यांचा चिवचिवाट सहन करण्याची क्षमता कुणी ठेवत नाही. झाडांवर कावळे आणि बगळ्यांचा होणारा किलबिलाट अनेकांना कानठाळे बसण्यासारखा वाटतो.शिवाय पक्ष्यांना खाण्यासाठीही अन्न मिळत नाही. शेतात उत्पादित होणाऱ्या पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. झाडाझुडुपांवर आढळणारे कीटकही आता पक्ष्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. या कीटकांवरही रासायनिक पदार्थांचा परिणाम होतो आहे. त्यामुळे पक्षांचे हे खाद्यही विषाक्त बनले आहे. त्यामुळेच गावात दिसणारे पक्षी आता दुर्मिळ झाले आहे. हळूहळू ग्रामीण भागही त्याच दिशेने जात आहे. सिमेंटचे वाढते जंगल, कापली जाणारी मोठमोठी वृक्ष आदी कारणांमुळे विविध प्रकारचे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व बाबी पर्यावरणवाद्यांसाठी चिंतन करायला लावणाऱ्या आहे. वाहनामुळे होणारे प्रदूषण, भ्रमणध्वनी-विविध प्रकारची संपर्क साधणे यामुळे निर्माण होणाऱ्या लहरी या बाबींवर नियंत्रण आणल्यास चिमण्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट परत येण्यास वेळ लागणार नाही, असे मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)
सिमेंटच्या जंगलात हरवला पक्ष्यांचा किलबिलाट
By admin | Published: May 26, 2015 12:36 AM