भंडारा : साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मोरेश्वर बापूसा मेश्राम यांनी तीनजणांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या नावावर कर्जाची परस्पर उचल केली. यात अठरा शेतकऱ्यांच्या नावाने ३२ लाख ७० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना साकोली पोलिसांनी शाखा व्यवस्थापकासह तीन आरोपी पकडून यापैकी दोघांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र सेंदूरवाफा येथे २०१२ ते २०१५ या काळात हा घोटाळा करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून बँकचे शाखा व्यवस्थापक मोरेश्वर मेश्राम यांनी संगनमत करून दोघांनी राजू मन्साराम बनकर व गौतम महादेव चांदेवार यांनी शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणात फसवणूक केली. या दोघांना साकोली पोलिसांनी १८ फेब्रुवारीला अटक केली. या दोघांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण शिवाजी वायकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे असून त्यावेळच्या शाखा व्यवस्थापक मोरेश्वर मेश्राम यांनी १८ शेतकऱ्यांच्या नावाने सुमारे ३२ लाख ७० हजार रुपयाचे कर्ज मंजूर केले. अर्जदार शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक कर्ज मागणी फॉर्मवर नमूद असताना कर्जदारास त्यांच्या खात्यावरील व्यवहाराचे संदेश जाऊ नये, यासाठी हेतूपुरस्पर मोबाईल नंबर सिस्टिमला अपलोड केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा झाले व पैसे काढण्यात आली, याचे संदेश गेले नाही. माहितीही शेतकऱ्यांना खूप उशिरा कळली. व्यवस्थापक मेश्राम यांनी राजू बनकर व गौतम चांदेवार व डुडेश्वर सोनवणे यांना हाताशी धरून बनावट कर्ज प्रकरणे तयार केली मोहन कापगते यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दाखविले आमिष
ओळखीच्या लोकांकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे जमा केली. त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले. परंतु हे कर्ज राजू बनकर यांनी शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेले कर्ज स्वतः उचलले. गौतम चांदेवार याची जीएमसी बोरवेल एजन्सी आहे. बोरवेल, इलेक्ट्रिक पंप, व पाईपलाईन यासाठी कर्जाची ११ शेतकऱ्यांची बोगस प्रकरणे त्याने केली. पैसे काढण्यासाठीचे फार्मवर फक्त मेश्राम याची स्वाक्षरी आहे. शेतकरी कर्जदारांच्या नावाने कर्ज काढायचे आणि पैसे स्वतःच उचलायचा. डुडेश्वर सोनवणे यानेही असाच कारभार केला.