भंडारा : गुप्त माहितीच्या आधारे चितळाची कातडी तस्करी करणाऱ्याला तुमसर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी पकडले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी रमेश नामदेव खोब्रागडे (वय ५५) व विवेकानंद ऊर्फ वजीर माटे (४३) दोन्ही राहणार तुमसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
माहितीनुसार, भंडारावनविभागांतर्गत येणाऱ्या तुमसर वनपरिक्षेत्रातील तुमसर शहरातील माँ भवानी ऑटो स्पेअर पार्टस् व रिपेअरिंग सेंटर येथे वन्यप्राण्यांच्या अवयवांचे अवैधरीत्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. वनपरिक्षेत्र कार्यालय तुमसर व फिरत्या पथकाने या रिपअरिंग सेंटरवर छापा घालून चितळाची कातडी जप्त केली. चितळ हा वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची ३ मध्ये येतो. त्याअंतर्गत रिपअरिंग सेंटरचा मालक व दोन कारागिरांना वन्यजीव अपराध प्रकरणात चौकशीकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय तुमसर येथे बोलविण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे चौकशीत गुप्त माहिती देणारा रमेश खोब्रागडे याने संबंधित रिपअरिंग सेंटर या दुकानात विवेकानंद माटे याच्या मदतीने चितळाची कातडी दुकानात ठेवली होती. त्यानुसार खोब्रागडे व माटे याला अटक करण्यात आली. १० दिवसांपासून वनाधिकारी व कर्मचारी चितळाच्या अवयव तस्करी प्रकरणात शोध घेत होते. रिपअरिंग सेंटरच्या दुकानातून वनप्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची माहिती व तशी चर्चाही शहरात रंगली होती. या संबंधीची गुप्त माहितीही वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसारच कारवाई करण्यात आली. या वन्यजीव अपराध प्रकरणाचा तपास तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले करीत आहेत. यात फिरते पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. टी. मेंढे, वनपाल टी. एच. घुले, वनरक्षक डेव्हीडकुमार मेश्राम, कविता किंदरे, क्षेत्र सहायक असलम शेख, वनपाल बी. डब्लू. निखाडे, बी. एच. गजभिये, ए. एन. धुर्वे, ए. जे. वासनिक, यू. एम. कोकुर्डे, पी. डी. चिचमलकर, एम. डी. शहारे, आदींचा समावेश आहे.
तीन दिवसांची ठोठावली वनकोठडी
n माँ भवानी ऑटो स्पेअर पार्टस् व रिपेअरिंग सेंटर येथून चितळाची कातडी जप्त करण्यात आली होती. यात या दुकानातील विवेकानंद ऊर्फ वजीर पूर्णचंद्र माटे, तसेच रमेश नामदेव खोब्रागडे या दोघांना पकडून तुमसर प्रथम श्रेणी न्यायालयात रविवारी हजर करण्यात आली. यात न्यायालयाने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९, ३९, ४८ अ, ५३ अंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी ठोठावली आहे.