- राहूल भुतांगे
तुमसर (भंडारा) : सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे. गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.
सारांश मुन्नालाल सुखदेवे (२७) रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर रवी सेवक टेकाम ३१ रा. रा. खैरलांजी जि. बालाघाट असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे. ते दोघे रवीची सासुरवाडी असलेल्या तुमसर तालुक्यातील बाळपूर हमेशा येथे आले होते. रात्री चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते. रात्री ८ वाजता कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही. त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पाण्यात पडले.
यापैकी रवी टकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. सारांश सुखदेवे पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती सासुरवाडीला दिली. त्यांनी ही माहिती तात्काळ गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या तरूणाचा शोध सुरू केला. मात्र अंधार व पाण्याचा अंदाज येत असल्याने थांगपत्ता लागला नाही, असे गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी भेट दिली.