भंडारा (देवानंद नंदेश्वर) : भंडारा - आंभोरा रस्त्यावरील मानेगाव बाजार येथून तिड्डी अर्जुनी रस्ता आहे. या भागातील शेत शिवारात बिबट्याचा धुमाकूळ आहे.सोमवारच्या रात्री बिबट्या दोन वासरांवर हल्ला चढवून त्यांची शिकार केली. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भंडारा तालुक्यातील अर्जुनी (पुनर्वसन) गिरोला येथील विनोद शेंडे यांचा अर्जुनी येथील शेतात अनेक वर्षापासून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतात. सोबतच दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. सोमवारी बिबट्याने गोठ्यातील दोन वासरावर हल्ला केला. त्यात दोनही वासरू ठार झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक पी. एस. मस्के, भंडारा तहसील अंतर्गत पहेला क्षेत्र मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहीर, अर्जुनीचे सरपंच चेतन राघोर्ते यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यात विनोद शेंडे यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. हिंसक प्राण्यांच्या हालचालींवर नियत्रंण ठेवण्यासाठी वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावला आहे. या शेतकऱ्यांना वन विभागाकडून पक्का गोठा बांधकाम करून आर्थिक मदत करण्याची मागणी आहे. या परिसरात तिड्डी लगतच्या जंगलात अनेक बिबट्यांचा वावर असल्याने पशुपालन व शेती व्यवसाय करण्यासाठी धोक्याचे ठरत आहे. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.