भंडारा : दोन बछडे गमावलेली वाघीण वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात बुधवारी ट्रॅप झाली. या वाघिणीचा गराडा परिसरात संचार असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पिलांची आई (वाघीण) याच परिसरात असावी, असा कयास वनविभागाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता आहे. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात चार कॅमेरे लावले. बुधवारी या चारही कॅमेऱ्यात ती दिसून आली. टी १० वाघीण असून, तिचे हे पहिलेच बछडे होते.
दरम्यान, सीसीएफ कल्याणकुमार यांनी आज भेट देऊन गराडा परिसराची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले. या वाघिणीवर उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर लक्ष ठेवून आहेत.
बछड्यांसाठी सैरभैर
पाण्याच्या टाकीत बुडून मरण पावलेल्या बछड्यांसाठी वाघीण सैरभैर झाल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी बछडे मृत्युमुखी पडले, त्या ठिकाणी वाघीण वारंवार वाकून पाहत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले. ही वाघीण आणखी १५ ते २० दिवस या परिसरात राहील, असा अंदाज आहे.