संस्था प्रतिनिधींची चर्चा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश गोंदिया : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा व शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये यासाठी खरीप पणन हंगाम सन २०१५-१६ करीता किमान आधारभूत खरेदी किमत योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचेशी आदिवासी सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांचे कक्षात बैठक घेऊन चर्चा केली.धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या अनुषंगाने संस्थेच्या सर्व समस्यांबाबत प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रतिनिधींनी सभेमध्ये मांडलेल्या मागण्या शासनस्तरावरील असल्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठविणार असल्याचे जिहाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. चर्चेअंती सर्व संस्थेच्या प्रतिनिधींनी दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे मान्य केले. जिल्ह्यात पणन महासंघाच्या अधिनस्त असलेल्या ४६ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या ३५ अशा ८१ धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. हे धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. सन २०१५-१६ मध्ये उत्पादित केलेल्या धानाची विक्री शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावरच करावी, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
दोन दिवसात खरेदी केंद्र सुरु करणार
By admin | Published: November 21, 2015 12:33 AM