चारचाकी उलटली: चार जण गंभीर जखमी, सहल बेतली जीवावर, लेंडेझरी शिवारातील घटनातुमसर : नागपूरवरून बावनथडी प्रकल्पावर मासेमारीकरिता जाणाऱ्या युवकांची चारचाकी रस्त्याशेजारील एका झाडाच्या खुंटावरून गेली. यात चारचाकी उसळून अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात लेंडेझरी-पवनी मार्गावर लेंडेझरी शिवारात आज शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला.या अपघातात मो. अहमद अंसारी (२३), मो. सोहेल इकबाल अंसारी (२४) रा. नागपूर यांचा मूत्यू झाला. अपघातानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका दोन तासपर्यंत अपघातस्थळी आली नाही. इतर जखमींना खाजगी वाहनाने तुमसर येथे उपचाराकरिता नेण्यात आले. गंभीर जखमींची नावे मोहसीन मोहम्मद रफीक (२३), मंसूर मोहम्मद साहाबुद्दीन अंसारी (२६), मो. मुस्ताक अंसारी (२३) व मो. आरीफ अंसारी (२३) सर्व राहणार मोमीनपुरा, नागपूर अशी आहे. गंभीर जखमीवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.मोमीनपुरा, नागपूर येथून सर्व सहा जण चारचाकी क्रमांक एमएच ३६ - ४३१५ ने बावनथडी प्रकल्पावर मासेमारी करण्याकरिता निघाले. पवनी-लेंडेझरी मार्गावर रस्त्याच्या बाजूला कापलेल्या झाडाची मोठी खुंटी आहे. खुंटावरून वाहन गेले. यात चारचाकी अनियंत्रित झाल्याने उलटली. या अपघातात दोघे जण घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या युवकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीनेला भ्रमणध्वनीवर अपघाताची माहिती दिली. दोन तासांची एक रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेत मृतांना घेवून जाता येत नाही, असे सांगितले. नागपूर येथील मित्रांनी तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. रुग्णवाहिका लवकर आली असती तर एका युवकाचे प्राण वाचले असते, असे गंभीर जखमींनी लोकमतला सांगितले. लेंडेझरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथे सुद्धा रुग्णवाहिका व डॉक्टर आहेत, परंतु घटनास्थळी सौजन्य म्हणून कुणीच आले नाही.लेंडेझरी वनपरिक्षेत्राअंतर्गत हा परिसर येतो, खुंटी मुळापासून येथे काढण्याची गरज होती. या अपघाताला खुंटी जबाबदार ठरली. वनअधिकाऱ्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपघातात दोन ठार
By admin | Published: July 10, 2016 12:15 AM