भंडारा : भर पावसात कोल्हापुरी बंधाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या जावई व साल्यावर वीज कोसळल्यानंतर नाल्यात पडून मृत्यू झाला. ही घटना गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर (हमेशा) येथील धरणावर घडली. दिनेश खुणे (४८, रा. पुलपुट्टा, मध्य प्रदेश) आणि त्यांचे जावई बुधराम हांडके (४८, रा. हिरापूर, हमेशा) ता. तुमसर यांचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी दिनेश हा त्यांचे जावई बुधराम यांच्याकडे हिरापूर येथे घरी आला होता. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोघेही गावाजवळील नाल्यावरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडल्यानंतर परत येत असताना अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाल्याने दोघेही सिमेंट बंधाऱ्याजवळील बेलाच्या झाडाखाली थांबले. मात्र त्याचवेळी वीज कोसळली. यात दोघेही जखमी होऊन नाल्याच्या पाण्यात पडून काही अंतरापर्यंत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रात्री ८.३० पर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील पथकासह घटनास्थळी पोहोचले. आणि दोघांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. रात्री ११ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी दोघांचेही मृतदेह नाल्याच्या काठावर आढळून आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील म्हणाले, शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही, मात्र, वीज कोसळल्यानंतर ते जखमी होऊन नाल्याच्या प्रवाहात वाहून गेले. यात त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज आहे. याप्रकरणी लक्ष्मीकांत हांडके (२३) यांच्या फिर्यादीवरून गोबरवाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.