मोहाडी (भंडारा) : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांवर जेसीबीच्या बकेटने हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रेती तस्करांना मोहाडी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दोघांचीही रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे.
जेसीबी चालक रंजित ठवकर व टिप्पर चालक विवेक चामट (रा. रोहा, ता. मोहाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. बुधवारी सायंकाळी मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांनी रोहा रेती घाटावर धाड मारली. तेव्हा त्यांच्यावर जेसीबीच्या बकेटने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. स्वसंरक्षणासाठी तहसीलदारांनी रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यामुळे रेती तस्कर पसार झाले. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी हजर होता. यातील आरोपींचा शोध सुरू केला असता, प्रथम जेसीबी चालक रंजित ठवकर हा मोहाडी पोलिसांपुढे शरण आला. थोड्या वेळात दुसरा आरोपी टिप्पर चालक विवेक चामट हा सुद्धा पोलिसांपुढे हजर झाला. त्यांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी मोहाडी न्यायालयापुढे हजर केले असता, दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्यांची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.