पवनी (भंडारा) : मित्रांसोबत स्वातंत्र्य दिनाची सुटी घालविण्याकरिता गोसेखुर्द धरणावर आलेल्या उमरेड येथील दोन सख्ख्या भावंडांचा सायंकाळी पाच वाजता सेल्फी काढताना वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली.
मंगेश मधुकर जुनघरे (वय ३७) व विनोद मधुकर जुनघरे (३५, दोघेही रा. रेवतकर ले आउट उमरेड, जि. नागपूर) येथील रहिवासी आहेत. १५ ऑगस्टला भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणावर अन्य दोन मित्रांसोबत ते फिरायला आले होते. गोसेखुर्द धरणाच्या लगतच वीज निर्मिती केंद्र आहे. नदीच्या काठावर बसून सेल्फी काढत असताना विनोद यांचा तोल जाऊन पाण्यात पडला. खोल व पाण्याला प्रवाह जास्त असल्यामुळे विनोद हा पाण्यात बुडू लागला.
लहान भाऊ पाण्यात पडून बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ मंगेश याने जिवाची पर्वा न करता वैनगंगेच्या पात्रात उडी घेतली. मात्र, मंगेशला विनोदचे प्राण वाचविता आले तर नाहीच, स्वत:चेही प्राण वाचवू शकला नाही. वैनगंगेच्या पात्रात दोन्ही भावंडांना जलसमाधी मिळाली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी जमा झाली. पवनी पोलिसांनी स्थानिक मासेमाऱ्यांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधमोहीम राबवली. मात्र, एकही मृतदेह मिळाला नाही.
सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. यात सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान मंगेशचा, तर दुपारी १ वाजताच्या सुमारास विनोदचा मृतदेह आढळला. शोधकामासाठी नागपूर येथील एसटीआरएफची टीम बोलाविण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच स्थानिक मासेमाऱ्यांना मृतदेह शोधण्यात यश आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणण्यात आले. शोधमोहिमेवर पवनीचे पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड लक्ष ठेवून होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक चिलांगे, पोलीस उपनिरीक्षक भिलावे, पांगारे, पोलीस कळपते, बिसने, गजभिये, चव्हाण उपस्थित होते.