लाखनी (भंडारा) : विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर लाखनी पोलिसांनी जप्त केले असून, टिप्पर चालक-मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी करण्यात आली. ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेंद्र ताराचंद झिंगरे (४२), शेरसिंग दसाराम चव्हाण (४३), आकाश घनश्याम चौधरी (२३, सर्व रा. सावरबंध, ता. साकोली) आणि पंकज चांददेव कापगते (३२, रा. पिंडकेपार, ता. साकोली) अशी आरोपींची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गाने अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गौरीशंकर कडव आणि पोलीस नायक पीयुष बाच्छिल यांच्या पथकाने लाखनी उड्डाणपुलावर नाकाबंदी केली.
वाहनांची तपासणी करीत असताना पिवळ्या रंगाचा टिप्परमध्ये (एमएच ४०-एके ६५५०) ५ ब्रास आणि टिप्परमध्ये (एमएच ३१-एफसी ५३८१) ५ ब्रास रेतीची वाहतूक करतांना आढळून आले. दोन्ही टप्पर जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लाखनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.