१० दिवसांतील दुसरी घटना : तुमसर-गोंदिया मार्ग दोन तास बंद, दुचाकीस्वार फरारतुमसर : तुमसर रोड येथील रेल्वे फाटकाला एका अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने फाटकात तांत्रिक बिघाड आला. फाटक मध्यभागातून वाकली. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. रेल्वे प्रशासनाने अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल केला.तुमसर रोड येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर एलएम ५३२ क्रमांकाची रेल्वे फाटकाला गुरूवारी दुपारी २.१० वाजता एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक मारली. त्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला. या धडकेत गोंदिया मार्गावरील फाटक मध्यभागातून वाकली. यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाचे अभियंत्यासह इतर कर्मचारी दाखल झाले. सुमारे दोन तास त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तांत्रिक बिघाड दूर केला. दोन तासानंतर दुपारी ४ वाजता या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. अज्ञात दुचाकी स्वाराच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने गुन्हा दाखल केला. कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता तथा धडक मारणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करिता रेल्वे प्रशासनाने येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. यामुळे या घटनेला निश्चितच आळा बसेल. रेल्वे हायटेक करण्याचा दावा येथे फोल ठरला आहे. स्थानिक रेल्वेस्थानक अधिक्षकांनी तसा प्रस्ताव विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना पाठविण्याची गरज आहे. अशा घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकीची धडक रेल्वे फाटक तुटले
By admin | Published: July 31, 2015 1:01 AM