धनराज विश्वनाथ गायधने (४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. १९ फेब्रुवारी, २०२० रोजी ते दुचाकीने चिखलीवरून चिचोलीकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या समोर अचानक हरणांच्या कळप आला. हरणाची जोरदार धडक लागल्याने डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही महिने नागपूर येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती व घरी पाठविण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून ते घरी खाटेवरच होते. शेतकरी गायधने यांचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी आतापर्यंत १५ लाखांच्यावर खर्च केला. मात्र, यश आले नाही. अखेर साेमवार २२ मार्च रोजी पहाटे ४ वाजता धनराज गायधने यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच, संपूर्ण गावकरी गोळा झाले. यावेळी पप्पा उठा ना, हा चिमुकल्या मुलीचा टाहो ऐकून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांच्यामागे पत्नी वनमाला, मुलगा धीरज, मुलगी चारवी, आई बारूबाई असा परिवार आहे.
बॉक्स
पाठपुरवा करूनही मदत नाही
मदतीसाठी वर्षभर वनविभागाकडे कुटुंबातील सदस्यांनी पाठपुरावा केला. मात्र, वनविभागाने कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. सोमवारी मृत्यू झाल्यानंतर, माजी आमदार चरण वाघमारे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना हा प्रकार माहीत झाला. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ मदतनिधी खात्यात वळता केला. यावेळी प्रशांत लांजेवार, भाजप तालुका ग्रामीणचे महामंत्री विष्णुदास हटवार, श्याम आकरे उपस्थित होते.