भंडारा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे मोबाइल गॅलरी फोडून महागडे मोबाइल व इतर साहित्य चोरणाऱ्या दोघांना आंधळगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले.
रज्जब उर्फ पप्पू नियाज अली सय्यद (२३, रा. आंधळगाव, ता. मोहाडी) आणि नितेश उर्फ राजकुमार गिरी (२६, रा. तारसा चौक, कन्हान, जि. नागपूर) अशी चोरट्यांची नावे आहेत. आंधळगाव येथील लीलाधर निखारे यांच्या मोबाइल गॅलरीत ११ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी विविध कंपन्यांचे मोबाइल आणि इतर साहित्य लंपास केले होते. या प्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आंधळगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यात रज्जबला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला नकार दिला. परंतु पोलिसी हिसका दाखविताच त्याने चोरी केल्याचे कबूल केले; तसेच आपल्या एका साथीदाराचे नावही सांगितले. त्यावरून दुसरा चोरटा नितेशलाही कन्हान येथून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता पोलीस कोठडी घेण्यात आली. दरम्यान, त्यांच्याकडून मोबाइल, घड्याळ असा २६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनात आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी केली.