भंडारा : रोवणीनंतर दुपारच्या सुमारास धुऱ्यांवर बसून जेवण करीत असलेल्या सहा महिलांवर वीज कोसळली. या घटनेत दोन महिलांना जागीच ठार तर चार महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व महिला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावातील आहेत. ही घटना 2:30 वाजता दरम्यान निलज खुर्द पासून १ किमी अंतरावरील सुर्यप्रकाश बोंदरे यांच्या शेतशिवारात घडली.
बेशुद्धावस्थेतील महिलांमध्ये वच्छला जाधव, सुलोचना सिंगनजुडे, निर्मला खोब्रागडे, बेबीबाई व गिताबाई यांचा समावेश आहे. यातील लताबाई वाढवे जागीच ठार झाल्या तर दुसऱ्या महिलेचे नाव अद्याप कळलेले नाही. जखमींवर करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती युवराज मोहतुरे, करडीचे माजी सरपंच महेंद्र शेंडे यांनी दिली आहे.
तिरोडा तालुक्यातील (गोंदिया जिल्हा) १४ महिला रोवणीच्या कामानिमित्त मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द गावात आल्या होत्या. निलज खुर्द येथील शेतकरी सुर्यप्रकाश बोंदरे यांचे शेतात त्यांनी सकाळपासून रोवणीचे काम केले. दुपारच्या सुमारास धुऱ्यांवर बसून जेवण करीत असतांना अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. काही कळण्याच्या आत वीज कोसळली. यात सहा महिला जागीच बेशुद्धावस्थेत शेतात कोसळल्या. घटनेनंतर एकच धावपळ झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याने बेशुद्ध महिलांना बैलबंडीच्या सहाय्याने गावात आणून नंतर करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी उसळल्याची माहिती आहे.