युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाच्या सादरीकरणाचे परीक्षक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अर्थतज्ज्ञ माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने, युवक बिरादरीच्या संचालक स्वर क्रांती आणि आशुतोष शिर्के उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून कौतुक केले. यावेळी विजेत्यांना पुरस्कार आणि सर्व सहभागी युवकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या अभिरूप युवा संसदेत लोकसभा अध्यक्ष, प्रधानमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, संसदीय सचिव अशा सर्व भूमिका युवकांनी निभावल्या. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील प्रशांत वाघाये व कमल साठवणे हे विरोधी पक्षाच्या बाजूने होते. ज्या पद्धतीने संसदेत खासगी विधेयक सादर केले जाते त्याप्रमाणे विरोधी पक्षाचे खासदार म्हणून प्रशांत वाघाये यांनी "निर्माणस्नेही २०२२ " हे विधेयक या अभिरूप युवा संसदेत सादर केले. विधेयकाच्या बाजूने झालेल्या चर्चेत विधेयकाची सकारात्मकता कमल साठवणे यांनी मांडली. अर्थतज्ज्ञ डॉ. मुणगेकर म्हणाले, राष्ट्राला कोणत्याही जाती-धर्म, रंग, वर्ण यानुसार भेदभाव नको तर समानता हवी आहे. आणि ती जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला लाभली आहे. या स्पर्धेतील विजयापेक्षा तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. निवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, मतपेटीतून क्रांती घडत असते. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या हिताचे काम करणे होय. औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर अशा चार विभागांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिक्रिया
या सुंदर उपक्रमाच्या माध्यमातून विधानभवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात (Central Hall) आम्ही एक दिवस लोकप्रतिनिधीसारखे बोलू शकलो. ही आमच्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट आहे.
प्रशांत वाघाये
असे उपक्रम खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही प्रणालीबद्दल युवकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे आहेत. आमच्यासारख्या युवकांना ही संधी लाभली यासाठी आम्ही युवक बिरादरी भारत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.
कमल साठवणे