खात्यातील पैसे ऑनलाइन काढणे व भरणे सध्या केले जात आहे. या आधुनिक पद्धतीमुळे फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्राहकाचे ओटीपी किंवा एटीएम पासवर्ड न मागताही खात्यातून पैसे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. कोसरा येथे कायम वास्तव्य असलेले आणि काश्मीर येथे सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत एका फौजी व्यक्तीच्या खात्यातून सतत तीन दिवस प्रत्येकी दहा हजार असे तीस हजार रुपये दुसऱ्यांच्या खात्यावर गेल्याने ऑनलाइन व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. असे प्रकार पवनी तालुक्यात यापूर्वी घडले आहेत. यासंबंधी पोलीस ठाण्याला तक्रार देऊन काहीही त्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अशा या फसवणुकीच्या घटनावर आळा घालणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांनी ओटीपी किंवा पासवर्ड दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला सांगू नये, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. हे प्रकार वाढत असल्याने नागरिक बँकांमध्ये खात्यावर पैसे ठेवायला घाबरत आहेत.
ऑनलाइन आर्थिक व्यवहारात फसवणुकीचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:41 AM