अड्याळ येथील लसीकरण केंद्रातील प्रकार : दोनपैकी एकाच केंद्रात लसीकरण
२३ लोक ०५ के
अड्याळ : शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत, अड्याळने बुधवारी पहाटेच्या सुमारास गावात दवंडी दिली होती, की गावातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील समस्त ग्रामस्थांनी उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा व सुजाता कन्या विद्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने उत्साहात गावातील ग्रामस्थ गेले. पण, दोनपैकी एकच केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली. शंभर ग्रामस्थांची ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर मात्र नोंदणी होत नसल्याने जवळपास अनेक ग्रामस्थ लस न घेताच गेल्या पावली परतले. हा प्रकार बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सुजाता कन्या विद्यालयातील लसीकरण केंद्रावर पाहायला मिळाला.
घडलेल्या प्रकारामुळे ग्रामवासीयांनी संताप व्यक्त केला. जिथे लस घ्यायला तयार आहेत, पण वेळेवर द्यायला कुणी तयार नाही किंवा तशी व्यवस्थासुध्दा तत्काळ करणारे जबाबदार अधिकारी नाहीत. दुसरीकडे जिथे लस घेणारे उपलब्ध होत नाहीत तिथे लस देणारे कुणीतरी येतील म्हणून वाट पाहात बसतात. एकंदरीत अड्याळ येथे जेव्हा दवंडी करण्यात आली, तेव्हा ग्रामस्थांनी सकाळी १०पासून केंद्र गाठले. पण, जेव्हा शंभर ग्रामस्थांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लसीकरण केले तेव्हा बाकीचे अनेक ग्रामस्थ लसीकरण न करताच घरी परतले. कारण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आकडा फक्त शंभर असल्याचेही तेथील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
देशातील कोरोनाचे संकट टाळायचे असेल तर शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन होणे आवश्यक असले, तरी त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे लसीकरण. यासाठी गावागावात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कुठे प्रतिसाद जास्त, तर कुठे अत्यल्प, तर कुठे आजही कमी प्रमाणात लसीकरण होत आहे. यामुळे लस डोसेससुध्दा व्यर्थ जात आहेत. पण जिथे ग्रामस्थ लसीकरण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत, तर तत्काळ उपाययोजना करणे संबंधित अधिकारी का करू शकत नाहीत, असाही प्रश्न पडतो आहे, याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशीही मागणी होत आहे.