राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडतात. वायू प्रदूषण होते. त्याच प्रकारे जंगलाची तोड रोखून पर्यावरणाचा समतोल राखता यावे आदी कारणे पुढे करून केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गोरगरीब नागरिकांना अनुदानावरच गॅस उपलब्ध करून दिला. ते गॅस कनेक्शन जवळपास मोफतच उपलब्ध होत असल्याने जवळपास सर्वांनीच गॅस सिलेंडर खरेदी केला. त्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकीही मिळविली. मात्र वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे ग्रामीण जनता मेटाकुटीस आली आहे. हातावर आणून पानावर खाणारे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना एका वेळेस एक हजार रुपये देवून गॅस सिलेंडर खरेदी करणे शक्य नसल्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. परिणामी चुलयुक्त ग्रामीण या शासनाच्या निर्धारावर पूर्णत: पाणी फेरले जात आहे. अन्न वस्त्र निवारा याकडे प्राथमिक गरजा म्हणून पाहिजे जात होते. त्यात आला घरगुती गॅस सिलेंडरची भर पडली आहे. अगदी डोक्यावर गवताचे छप्पर असेल त्याच्याही घरात उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिसू लागले होते.ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन योग्य पाऊल उचलून सुरुवातीला वाहवाही लुटली असली तरी भाव वाढ रोखू न शकल्याने ते ग्रामस्थ आता बोटे मोडू लागली आहेत.जीवनमान उंचाविण्याच्या नादात शासनाने गॅस सिलेंडरची खैरात वाटून भाववाढ केल्यामुळे ग्रामीण भागात घरातील एका कोपऱ्यात गॅस सिलेंडर ठेवण्यात येवून चुलीवर स्वयंपाक सुरु झाला आहे. पर्यावरणाची काळजी असल्यास शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी.-ठाकचंद मुंगुसमारे, रायुकाँ तालुकाअध्यक्ष, तुमसर.
‘उज्ज्वला’ने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 9:47 PM
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.
ठळक मुद्देसिलिंडरने केले हजारी पार : ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवरच