पालोरा (करडी) : शिक्षकाच्या मागणीसाठी जवळच्या केसलवाडा येथील पालकांनी आपल्या मुलांना १ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाठविलेच नाही. याची दखल घेत आज मंगळवारला गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे व शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. गणवीर यांनी शाळेला भेट देवून तात्पुरते शिक्षक देण्याचे लेखी पत्र दिले. यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे ४१ विद्यार्थी आहेत. यासाठी दोन शिक्षक आहेत. परंतु मुख्याध्यापक घनश्याम समरीत नेहमी रजेवर जात असतात. कोणते ना कोणते काम आहे म्हणून गैरहजर राहत असतात. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता पालकांनी जोपर्यंत नवीन शिक्षक येत नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे लेखी निवेदन दिले. यामुळे सोमवारला ४१ पैकी फक्त दोन मुली शाळेत गेल्या होत्या. याची दखल घेत मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. गणवीर यांनी शाळेला भेट देवून पालकांशी चर्चा केली. पालकांनी जोपर्यंत शिक्षक देत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेत नाही, असे सांगितले. यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी बोंडे शाळेतील शिक्षक गणेश धांडे यांना तात्पुरते शाळेत पाठवित असल्याचे लेखी पत्र दिले. २४ जानेवारी रोजी पालकांनी पत्र देवूनही केंद्रप्रमुख रजनी माथुरकर यांनी शाळेला भेट दिली नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
अखेर पालकांच्या आंदोलनाला यश
By admin | Published: February 03, 2016 12:43 AM