बैठे पथक बिनकामाचे : परीक्षा केंद्रात मनमर्जी कारभार, एजंट सक्रिय असल्याचा संशयमोहाडी : तालुका ठिकाणाहून दूरवरच्या परीक्षा केंद्रांवर पेपर नेण्यासाठी अतिरिक्त केंद्रसंचालक अनधिकृतपणे एक व्यक्ती सोबत नेत असतो. अतिरिक्त केंद्रसंचालकांना मदत करणारी ही व्यक्ती परीक्षा केंद्रावर पूर्ण कालावधीत मुक्तसंचार करते. यामुळे अगदी सहजपणे पेपरमधील प्रश्न बाहेर पडण्याचे काम ‘ती’ व्यक्ती करीत तर नाही ना, अशी चर्चा आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षकांकडून परीक्षा केंद्रावर पेपर नेण्याचे कार्य अतिरिक्त केंद्रसंचालकांना पार पाडावे लागतात. तालुक्यापासून १५ ते २० कि.मी. अंतरापर्यंत परीक्षा केंद्रावर पेपर नेण्याची फार मोठी जोखीम अतिरिक्त केंद्र संचालकांना पार पाडावी लागते. परिरक्षकांचे कार्यालय ते परीक्षा केंद्र या अंतराच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक म्हणून अतिरिक्त केंद्रसंचालक पेपर नेण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेत आहेत. पेपर नेण्यासाठी मदतगार म्हणून जो व्यक्ती अतिरिक्त केंद्रसंचालक नेतात तो व्यक्ती अनधिकृत असतो. त्याची नियुक्ती परीक्षा मंडळ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यापैकी कोणीही करीत नाही. असा अनधिकृत व्यक्ती अतिरिक्त केंद्र संचालकासोबत परीक्षा केंद्रावर जातो. पेपर फोडण्यापासून ते पेपर सुरु असेपर्यंत तो व्यक्ती पूर्णकाळ परीक्षा केंद्रावर मनमर्जीने मुक्तसंचारही करीत असतो. बाहेरून येणारा अतिरिक्त केंद्रसंचालक असल्यामुळे त्या अनधिकृत व्यक्तीला परीक्षा केंद्रावर भाव दिला जातो. असा हा अतिरिक्त केंद्र संचालकाचा सहाय्यक कधीही परीक्षाकाळात आत-बाहेर असा प्रवास करतो. आत बाहेर येण्याची नियमबाह्य मुभा असल्याने पेपरफुटीचा संशय बळावला असून आर्थिक व्यवहार करून निवडक परीक्षार्थ्यांची मदत केली जात असल्याची विश्वसनीय माहिती, आहे.सध्या अॅन्ड्राईड मोबाईलचा युग आहे. अशा स्थितीत पूर्व प्रश्नपत्रिकाच बाहेर तर येत नाही ना! अशी शंका बळावत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच परीक्षा केंद्रावर विशेषत: गणित व विज्ञान विषयाचे प्रश्न बाहेर आणले जातात. अशा घटना पूर्वीही घडल्या आहेत. आताही तसेच होत असल्याचे जाणवत आहे. काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, एखाद्या शिक्षकाकडून ते प्रश्न सोडविले जातात. उत्तरांची झेरॉक्स काढली जाते. तालुकास्थळावरच्या परीक्षा केंद्रासह ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर त्या अगदी सहजतेने झेरॉक्स पोहचविल्या जात असतात. गणित व विज्ञान पेपरला परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकाच्या उत्तरांचे झेरॉक्स पोहचविण्याचे काम करण्यासाठी कामगिरी काही विशिष्ट लोक करीत असतात. परीक्षा केंद्राबाहेर गर्दी असो वा नसो आत या दोन विषयाचे पेपरचे उत्तर नेण्यासाठी बहुतेक केंद्रावर सेटींग केली जाते. तसेच काही परीक्षा केंद्रावर अतिरिक्त केंद्रसंचालक पोहचताच प्रश्नपत्रिका फोडली जाते. प्रश्नपत्रिका उतरविली जाते. नंतर काही विषय शिक्षक परीक्षा केंद्राच्या आतच बसून त्या प्रश्नांच्या उत्तरांची कार्बन कॉपी जास्त प्रमाणात काढतात. विशिष्ट व्यक्ती जवळ कॉपी सोपवून हे विषय शिक्षक उजागरीने बाहेर पडतात. दुसरीकडे काही परीक्षा केंद्रावर पोलीस यंत्रणा पेपर सुरु झाल्यावर पोहचतात, असेही दिसून आले आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर असणारे पोलीस, होमगार्डही काही प्रमाणात कॉपी आत जाण्यासाठी मदत करीत असतात. परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा चालतो त्याला दोषी केंद्रसंचालक, अतिरिक्त केंद्र संचालक आहेत. आता बैठे पथक आहेत. पण ते बैठे पथक कामाचे नाहीत. पूर्ण पेपरला एकच बैठे पथक सदस्य परीक्षा केंद्रावर कार्य बजावत आहेत. माध्यमिक विभागाचेच शिक्षक असल्याने तेही काही करीत नाही. नुसते नावाप्रमाणे ‘बैठेच’ असतात.दुसरीकडे बाहेर आलेल्या प्रश्नांची उत्तरही झेरॉक्सच्या किंवा कार्बन कॉपीच्या माध्यमातून परीक्षा केंद्राच्या आत कसे जातात हे परीक्षा केंद्राचे संरक्षण करणाऱ्या पोेलीस, होमगार्ड यांना माहित आहे. सगळीच यंत्रणा कुंपणच शेत खात असल्याचे दिसून येत आहे. भरारी पथकही शिक्षण विभागाचे आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याची बदनामी होवू नये म्हणून कॉपी करताना कोणी आढळले तर दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)पेपरचा गठ्ठा मोठा राहत असल्याने अतिरिक्त केंद्र संचालकांना एका अन्य व्यक्तीची मदत घ्यावीच लागते. ही तांत्रिक समस्या आहे. मदत करणारा व्यक्ती स्थानिक शाळेकडूनच दिला जातो. त्यामुळेच त्यांच्या परीक्षा केंद्राच्या आता जाण्याने कोणताही फरक पडणार नाही.- श्रीराम चव्हाण, उपसचिव, विभागीय परीक्षा मंडळ, नागपूर.
केंद्रांवर पेपर नेण्यासाठी अनधिकृत व्यक्तीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 1:26 AM