नाकाडोंगरी परीसरातील प्रकार : जिल्हा परिषद शाळेची व्यथानाकाडोंगरी : जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातर्फे लाखो रूपये रुपये खर्चून नानाविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील विद्यार्थ्यांना आजही वर्गखोल्याअभावी झाडाखाली विद्यार्जन करावे लागत आहे. ‘डिजिटल’चा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभागाला ही वास्तविकता केव्हा दिसणार? असा प्रश्न या भागातील पालकांनी केला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणातील झाडाखाली बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेची जुनी इमारत जर्जर झालेली असून शाळेच्या छतातून वर्गखोलीत कवेलू पडू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडाखाली विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याचे ठरविले. याठिकाणी विद्यार्थ्यांना धडे देताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीसाठी किंवा विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी पर्यायी वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परीषद पूर्व माध्यमिक शाळेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून नवीन वर्गखोली बांधण्याची मागणी पालकांनी केली आहे.(वार्ताहर)
डिजिटल जमान्यात शाळा भरते झाडाखाली
By admin | Published: March 26, 2017 12:22 AM