भंडारा: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे २५ गड-किल्ले भाड्याने देण्याची योजना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, डेस्टिनेशन वेडिंग यासाठी हे किल्ले देण्याचा त्यांचा विचार असल्याची माहिती समोर अली होती. त्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर आक्रमण करत टीका केली होती. त्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी पन्हाळा गडावर रोमँटिक गाण्याच्या शूटिंगचे फोटो, व्हिडिओ शेअर करत ट्रोल करण्यात आले होते. मात्र गड किल्ल्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचा या गाण्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी मंगळवारी झालेल्या भंडाराच्या सभेत सांगितले.
‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं रोमँटिक पन्हाळा गडावर शूट झाल्यामुळे ‘गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत? असा प्रश्न उपस्थित करुन अमोल कोल्हेंना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यावर गड किल्ल्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचा या गाण्याशी काहीही संबंध नसून गडकिल्ल्यांविषयीच्या निर्णयाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच महाराष्ट्र बेळगाव सीमाभागावर आधारित चित्रपट असून तो आधी बघा, विषय समजून घ्या त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट करा असे अमोल कोल्हेंनी ट्रोल करणाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले सोडून, इतर किल्ल्यांच्या विकासाचे राज्य सरकारचे धोरण आहे. पुरातत्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता, राज्यात अनेक गड, किल्ले दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी यासाठी गुंतवणूकदारांची मते आजमावली जातील. त्यानंतरच धोरण ठरविले जाईल. मात्र, हे किल्ले देखील लग्नासाठी भाड्याने दिले जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.