भंडारा: सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी उपलब्ध करण्यात यावी. सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी २० हजार रुपये मानधनावर तरुणांची नियुक्ती करावी. जे सेवानिवृत्त पेन्शनधारक २० हजार रुपयांच्या मानधनावरील नोकरीसाठी रूजू होतील, त्यांची ते कार्यरत असेपर्यंत पेन्शन बंद करावी, या अन्य मागण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाचा पुढाकारात १ मार्च रोजी दुपारचे सुमारास जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. शासनाच्या बेरोजगार विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना मासिक २० हजार रुपये मानधनावर नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती बेरोजगार डीएड, बीएड, टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण तरुणांना धक्का देणारी व त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न भंग करणारी आहे. राज्यात यामुळे बेरोजगारीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.
शासकीय नोकरीसाठी आधीच बेरोजगार चिंतेत असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून शासनाने बेरोजगारांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा निषेध यावेळी तरुणांनी व्यक्त केला. शासन बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेत असेल तर, त्या विरोधात तरुणांनी आणि सुजाण पालकांनी विरोध करणे आवश्यक आहे, असे मनोगतही यावेळी व्यक्त करण्यात आले. मानधनावर शिक्षक म्हणून बेरोजगारांना नियुक्ती दिली असती तर, अनेकांना रोजगार मिळाला असता. त्या आधारावर अनेक तरुण-तरुणीचे विवाह देखील झाले असते. तरुणांनी विरोध केला नाही तर, सर्वच विभागात अशी नियुक्ती केली जाऊ शकते, असा धोकाही व्यक्त करण्यात आला.
निवेदन देतेवळी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, संयोजक जीवन भजनकर, उमेश सिंगणजुडे, निकेश रेहपाडे, अमित दुधबर्वे, महेंद्र तुमसरे, पवन मशीने, प्रकाश मुटकुरे, हिवराज नंदनवार, प्रफुल मेश्राम, कामेश लेंडे, अमित वैद्य, गौरव कुंभारे, सुधीर सार्वे, सुरेश खंगार, श्रद्धा सेलोकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.