तुमसर : तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या या कारखान्याचे सुमारे २०० कोटी रुपये शासनाने वीज बिल माफ केल्याची माहिती आहे. आजतागायत एकाही लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष दिले नाही. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. या कारखान्याला एनटीपीसी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करीत होते. परंतु केवळ देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट या कारखान्याला होती. कराराचा भंग केल्याचा ठपका या कारखान्यावर ठेवून सवलतीच्या दरातील वीज देणे बंद करून जुने वीज बिल वितरण कंपनीने बाजारभावाप्रमाणे वसुल करण्याचा निर्णय घेतला.कारखाना बंद१९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. नंतर एका करारानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. सन २००३ पासून या कारखान्याचा कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. अभय योजनेअंतर्गत या कारखान्याचे २०० कोटी रुपये माफ केल्याची माहिती आहे. कारखाना मालकाने केवळ ५० कोटी रुपये येथे भरले.शेतजमीन पडूनकारखान्याकडे सुमारे ३०० एकर शेती सध्या पडून आहे. कवडीमोल किमतीत या जमिनी घेण्यात आल्या होत्या. कारखाना परिसरात आजही कोट्यवधींचा मॅग्नीज पडून आहे. खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी येथे तैनात केले आहेत. कारखान्यात १० ते १२ कर्मचारी सध्या कार्यरत असून येथील माहिती कंपनी मालकाला ते नियमित देतात. खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अल्पवेतन येथे दिले जाते अशी माहिती आहे.कारखान्यात जाण्यास मज्जावकारखाना बंद आहे. परंतु कारखान्यात कुणालाच जाण्याची बंदी आहे. प्रवेश करायचा असेल तर मालकाची परवानगी पाहिजे असा आदेश येथील सुरक्षा रक्षक देतात. कारखान्याची स्थितीबद्दल माहिती विचारली असता माहित नाही असे एकच उत्तर येथून मिळते. कारखान्याच्या सभोवताल सुरक्षा रक्षक येथे तैनात केले आहेत.मॅग्नीजच्या खाणी तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी, बाळापूर व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे आहेत. येथील मॅग्नीज देशातील इतर भागात दररोज जात आहे. (तालुका प्रतिनिधी)१,२०० कामगारांवर उपासमारया कारखान्यात कायम व कंत्राटी पद्धतीने १२०० कामगार होते. कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची मागणी शासनाला केली होती. सन २००६ मध्ये ती त्यांना मिळाली. सुमारे ७०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सुमारे ३०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. या कामगारांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. नियमानुसार येथील कामगारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणे गरजेचे होते. परंतु ते मिळत नाही अशी माहिती आहे. कामगार बेरोजगार झाले ते सध्या मोलमजुरी करीत आहेत. कामगारांची स्थिती येथे अत्यंत दयनीय झाली आहे. परप्रांतीय कामगार येथून आपल्या राज्यात निघून गेले.
युनिव्हर्सल कारखाना बंद
By admin | Published: December 20, 2014 12:38 AM