तालुक्यातील साकोली पोलीस स्टेशनअंतर्गत ५८, ग्रामपंचायतीनुसार ५८ तंटामुक्त समित्या तयार करण्यात आल्या होत्या. गावातील लहानसहान भांडणांच्या सोडवणुकीकरिता न्यायालयाचा आश्रय घ्यावा लागत असल्यामुळे ग्रामीण जनतेच्या वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. गावातील भांडणतंटे आपसी सहमतीने सोडविले जावेत, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, सरकारी जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण व्हावे, याकरिता तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अस्तित्वात आली. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा ठरविण्यात आला होता. या गाव समितीची ग्रामसभेतून निवड करण्यात येत असे. तिने अवैध व्यावसायिकांवर वचक निर्माण करून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अवैध धंद्यांवर आळा घातला होता. त्यामुळे ग्रामीण परिसरात शांतता प्रस्थापित झाली होती. पण मार्च २०२० पासून कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे माहे ऑगस्टमध्ये होणारी ग्रामसभा झाली नाही. त्यामुळे नवीन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती तयार केली गेली नाही किंवा जुन्या समितीला मुदतवाढ दिली गेली नाही. विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत व्यासनाधिन होण्याच्या मार्गावर आहेत, तर मद्यपींच्या त्रासामुळे सायंकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. त्यामुळे लवकरात लवकर महात्मा गांधी तंटामुक्त समित्या तयार करण्याची मागणी होत आहे.
साकोली तंटामुक्त समितीअभावी ग्रामीण परिसरात अशांतता; अवैध धंद्यांचा ग्राफ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:41 AM