चौकशीची मागणी : नागरिकांसह शेतकऱ्यांचा सिंचन विभागाविरुद्ध असंतोषकोंढा (कोसरा) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिकेचे काम भंडारा-पवनी राज्यमार्गावरील चुऱ्हाड गावाजवळ सुरू आहे. हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कोसरा वितरिकेच्या कामात संबंधित कंत्राटदाराने मातीकाम केले. कालव्याचे काम केवळ आजूबाजूच्या शेतातील माती जेसीबी मशीनने खोदून वितरिकेच्या कामात लावले. कालव्याच्या कामात केवळ मातीचा उपयोग केला जात आहे. मुरुम व दगडाचा वापर केला नाही. कोसरा वितरिकेबाजूच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पुलाचे बांधकाम केले. अनेकठिकाणी पूल बांधकाम करून आजूबाजूला माती झाकून दिली आहे. पुलाचे बांधकामावर पाणी देणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. अधिकाऱ्यांकडून माती, मुरुम उत्खनन करण्याची परवानगी घेऊन शेतातील माती उत्खनन करणे आवश्यक होते. पण कोसरा वितरिकेच्या जवळच्या शेतमालकांना भुलथापा देऊन शेतातील मातीचे उत्खनन केले. या वितरिकेचे काम शासकीय निधी उचलण्यासाठी वेगाने सुरु आहे. भविष्यात या वितरिकेमुळे आजूबाजूच्या शेतीला धोका निर्माण होणार आहे. (वार्ताहर)पुलांचे बांधकाम निकृष्टसोनेगाव ते कोसरा दरम्यान कोसरा वितरिकेवर १० पुल व अॅपेक्सचे बांधकाम झाले. काही बांधकाम सुरु आहे. बांधकाम झाल्यावर ३० ते ४० दिवस सिमेंट कामावर पाणी देणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. पुल व अॅपेक्सचे काम झाले की मातीचे भरण भरून बांधकाम बुजविले जाते. राज्यमार्गावर सोनेगावपासून मोटघरे कॉलेजपर्यंत कोसरा वितरिकेचे काम झाले. काही पुल व अॅपेक्सचे काम सुरु आहे. तेव्हा शेतातील माती उत्खनन विना परवानगीने करणे, सिमेंट कामाची पाहणी एकही अधिकारी करीत नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तरी या कामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोसरा वितरिकेत मातीचा वापर
By admin | Published: June 01, 2016 1:46 AM