प्रस्तावित सिंदपुरी ते अर्जुनी/मोर. रस्ता बांधकामांतर्गत विरली (बु.) बसस्थानक ते आंबेडकर चौकादरम्यान ४७० मीटर लांबीच्या २ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. मात्र, अधिक नफा कमविण्याच्या हेतूने संबंधित कंत्राटदाराकडून या बांधकामात अवैधरीत्या उपसा करून आणलेल्या चोरट्या रेतीचा वापर केला जात आहे.
या बांधकामासाठी रेतीपुरवठा करणाऱ्या रेती तस्कराकडून विशेषतः रात्रीच्या सुमारास रेतीवाहतूक केली जाते. तलाठी कार्यालय, मंडळ निरीक्षक कार्यालय असलेल्या रस्त्याचाच रेती वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. मात्र , महसूल विभागाच्या सदर अधिकाऱ्यांकडून या अवैध रेती वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी सदर अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही.
बॉक्स
शासकीय कामातच शासनाला चुना?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या सिमेंट रस्ता बांधकामात राजरोसपणे चोरट्या रेतीचा वापर होत असताना ही बाब बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, याविषयी गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा प्रकारे सदर शासकीय कामात शासकीय अधिकाऱ्यांकडूनच शासनाला चुना लावण्याचे कारस्थान सुरू आहे. याविषयी संबंधित शासकीय यंत्रणेने चौकशी करून हा गोरखधंदा थांबवावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.