लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक प्रकारच्या त्रृट्या करण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या पॅचेसमध्ये मुरुमाऐवजी पांढरी माती टाकण्यात येत असल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार होत आहे. या बांधकामाची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजेश गभणे, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे यांनी केली आहे.जांब- आंधळगाव- मोहाडी- कुशारी ते मुंढरी-साकोली पर्यंत दोन पदरी राज्यमार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी वैनगंगा नदीवर रोहा येथे मोठा पूलही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे भूमिपूजन लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईगडबडीत करण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला अंदाजे तीन फूट खोल व पाच फूट रुंद असे खोदकाम एक महिन्याआधी पूर्वीच करून ठेवण्यात आले होते. या खोदकामात मुरूम टाकणे आवश्यक असताना येथे भिसमिश्रीत माती टाकली जात आहे, त्यामुळे या रस्त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.या रस्त्याचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंट्रक्शन कंपनी तर्फे संपूर्ण रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत. रस्त्याच्या कामात अनेक प्रकारच्या अनियमितता आहेत. बांधकामाच्या सुरवातीलाच जर पैसे वाचविण्यासाठी इस्टीमेट प्रमाणे काम न करता मनमर्जीप्रमाणे कामे करण्यात येतील तर, त्या रस्त्याचा दर्जा कसा राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.बांधकाम सुरु असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाचे कंत्राट कोट्यवधी रूपयांचे आहे. या रस्त्याचे सर्व सूत्र संचालन वरच्या स्तरावरुन होत असल्याचे समजते. त्यामुळे कोणीही कितीही ओरडले तरी कंत्राटदार आपल्याच मर्जीने कामे करेल असे जनतेचे म्हणणे आहे. मात्र या रस्त्यावर होणारा खर्च हा जनतेच्या खिश्यातून गेलेल्या पैश्यातून होत असल्याने व या रस्त्यावरुन येथील जनतेलाच जाणे येणे करायचे असल्याने हा रस्ता दर्जेदार तयार व्हावा, अशी अपेक्षा येथील जनता बाळगून आहे.राज्यमार्गाचे बांधकाम निकृष्ठ होत आहे. रस्ता बांधकाम करताना शासन आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. परिणामी नागरिकांना रस्त्याच्या दूरवस्थेचा सामना करावा लागेल. त्यामुळे होत असलेल्या कामावर बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी राजेश गभने, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, पुरषोत्तम पात्रे आदींनी केली आहे.
रस्ता बांधकामात मुरूमऐवजी पांढऱ्या मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:10 AM
लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : जांब - मोहाडी ते मुंढरी पर्यंत तयार होत असलेल्या दोन पदरी राज्यमार्गाच्या कामात अनेक ...
ठळक मुद्देबांधकामावर प्रश्नचिन्ह : जांब-मोहाडी ते मुंढरी राज्यमार्ग