तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसर हा आदिवासीबहुल परिसर मानला जातो. त्या परिसरात एकूण ४४ गावे येतात. त्यापैकी केवळ १९ गावांत पोलीस पाटील कार्यरत असून, इतर २५ गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. प्रशासनाला तत्काळ माहिती कळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची आहे. त्यामुळे प्रशासनाला गावखेड्यापर्यंत शांतता प्रस्थापित करण्यास मदत होते; परंतु मागील अनेक महिन्यांपासून हे पद न भरल्यामुळे स्थानिक प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस प्रशासनानेही जिल्हा प्रशासनाला पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत कळविले आहे. या गावात आहेत पोलीस पाटलांची पदे रिक्त : गोबरवाही परिसरातील मोठागाव, गारका भोंगा, गोवारी टोला, हिरापूर हमेशा, चिखली, डोंगरी बु., लेंडेझरी, गोंडीटोला, गणेशपूर, आष्टी, आलेसूर, कमकासूर, सुसूरडोह, कारली, सीता सावंगी, गुडरी, पांगडी, खापा, पाथरी, बाळापूर, मंगरली, येदर बुची, राजापूर, बाजार टोला या गावांचा समावेश आहे.
गोबरवाही परिसरात २५ गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:27 AM