४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आढावा बैठकीत दिली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने २१ व २२ जून रोजी जिल्ह्यातील २४४ गावांत विशेष लसीकरण अभियान राबविले. या अभियानाला लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. भंडारा ४३, मोहाडी २६, साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर-३४ व तुमसर १९ अशा २४४ गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.
२१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतली यात ७६१६ नागरिकांनी पहिला तर ७०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. २२ जून रोजी १८ ते ४४ वयोगटातील २६४९ तर ४५ वर्षावरील ५५८६ अशा एकूण ८२३५ नागरिकांनी लस घेतली. यात ७५७२ नागरीकांनी पहिला डोस तर ६६३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यासोबतच मंगळवारी १८ वर्षावरील तरुण तरुणींसाठी १३ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. बुधवारपासून १८ वर्षावरील नागरिकांनी जिल्हाभरात १६७ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असणार आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.