लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी राबिवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दिवसांत जिल्ह्यातील ३३ हजार ६६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचाही विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१ जून रोजी ८३१८, २२ जून रोजी ८२३५ आणि २३ जून रोजी १७ हजार ११५ नागरिकांना लस देण्यात आली.लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या मोहिमेत १६ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतली. यात ७६१६ नागरिकांनी पहिला, तर ७०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. २२ जून रोजी १८ ते ४४ वयोगटातील २६४९, तर ४५ वर्षांवरील ५५८६ अशा एकूण ८२३५ नागरिकांनी लस घेतली. यात ७५१२ नागरिकांनी पहिला डोस, तर ६६३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.२३ जून रोजी जिल्ह्यात १७ हजार ११५ नागरिकांनी लस घेतली. यात १८ ते ४४ वयोगटातील १६ हजार २६८ व ४५ वर्षांवरील ८४७ नागरिकांचा समावेश आहे. १६ हजार ५५८ व्यक्तींनी पहिला, तर ५५७ व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. यात ८७२३ पुरुष, तर ८३९२ महिला आहेत. १८ वर्षांवरील नागरिकांचे जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात १६ कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी १६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ७९ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण असून मृत्यूची नोंद झाली नाही. रुग्ण संख्या वेगाने कमी होत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे. गुरुवारी ५३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात एक, मोहाडी व साकोली येथे प्रत्येकी तीन तर लाखांदूर तालुक्यात दोन पॉझिटिव्ह आढळून आले. तर १६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख १२ हजार ६५७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४५५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले.
रुग्ण संख्या घटताच बाजारात गर्दी - गत १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. तर दुसरीकडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. भाजी बाजारासह मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र सकाळ-सायंकाळ दिसून येत आहे. अनेक जण तर मास्क न लावता बाजारात फिरताना दिसून येतात.