मोहाडी : गावापासून ते शहरांपर्यंत स्वस्थ व प्रसन्न तसेच भीतीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाचा प्रतिबंधक करायचा असेल तर प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. त्यासाठी लसीकरण करण्याचा धडाका सुरू करण्याची अंतिम प्रक्रिया मोहाडी तालुक्यात करण्यात आली आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालय मोहाडी शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कोविड-१९चे लसीकरण सुरू होते. लसीचा तुटवडा असल्याने उपकेंद्रावरील लसीकरण थांबविण्यात आले होते. आता लसीकरण पूर्ववत उपकेंद्र व गाव स्तरावर सुरू झालेले आहे.
शासकीय ग्रामीण रुग्णालय मोहाडी याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाला अंतर्गत बेटाला, मोहगाव देवी, आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आंधळगाव, हरदोली, कान्हळगाव, धुसाळा, डोंगरगाव, जांब प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जांब, ऊसर्रा, कांद्री, धोप, हिवरा, करडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत करडी, मुंढरी, नीलज, जांभोरा, पालोरा, देव्हाडा, वरठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वरठी, सातोना, नेरी व मांडेसर असे २२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत लसीकरण सुरू झाल्याचे पत्र गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी यांनी काढले आहे. यासाठी डाटा एंट्री करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या २२ शिक्षक व शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने लस घेतली पाहिजे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करावे. तसेच लस घेण्याबाबत गैरसमज व अफवा यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ नये. कोरोनाच्या कार्यात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आरोग्य विभाग चोवीस तास कार्य करीत आहे. यांच्या कार्याला गावातील सुशिक्षित युवक-युवतींनी गावातील प्रत्येक व्यक्तींनी लस घेतली पाहिजे यासाठी पुढाकार घ्यावा. आपला गाव सुदृढ करावा. गाव, राज्य व भारत देश कोरोनामुक्तीकडे नेण्यासाठी तयार करू, अशी शपथ सर्वांनी घेऊया, असे आवाहनही करण्यात आले आहे.