लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने आता १ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयातून लस दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील शासकीयसह खासगी दवाखान्यातून १५ ठिकाणी ही लस उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे यात सरकारी रुग्णालयातून नि:शुल्क तर खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये मोजून लस दिली जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेत उर्वरित व आगामी टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.
येथे मिळणार कोरोना लस
जिल्ह्यातील सात तालुक्यांतर्गत आठ शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस दिली जाणार आहे. यात भंडारात दोन ठिकाणी तर मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर येथील प्रत्येकी एका सेंटरचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालय अंतर्गत भंडारा येथील पार्वती नर्सिंग होम, पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंद्राक्षी आय केअर, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम, भुरे हॉस्पिटल तुमसर व तुमसर सिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोणाला मिळणार लस
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सुटलेले कर्मचाऱ्यांसह ६० वयोवर्ष ओलांडलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र गंभीर आजारी व्यक्ती किंवा लस घेण्यास सक्षम नसलेल्यांना ही लस दिली जाणार नाही. प्रथमदृष्टया तालुकानिहाय नोंदणी झालेल्यांना ही लस दिली जाणार आहे.
उर्वरित असलेल्यांनाही मिळणार लस
जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोविड लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात शिल्लक असलेले कर्मचारी यांनाही या मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के ज्येष्ठांची गणना करण्यात येते. यात ज्येष्ठांसह दोन टप्प्यात उर्वरित असलेले लोकांना ही लस देण्यात येणार आहे.
कशी होणार नाेंदणी१ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयात लस दिली जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य ॲपअंतर्गत नोंदणी करायची आहे. ज्या सेंटरवर ही लस दिली जाणार आहे तिथे जाऊन संपर्क साधून लसीबाबत माहिती जाणून घेता येणार आहे. याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करणे ही सर्वांना बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आहे.