भंडारा - गत दोन दिवसांपूर्वी आलेला संततधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातीत पाण्याच्या विर्सगामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक आठवड्यात दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी मुख्यमार्गासह तालुक्यातील काही गावांतील रस्ते बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा जनजीवन प्रभावित झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन येथील भीषण पूरस्थिती दर्शवली आहे. तसेच, सरकारला कळकळीची विनंतीही केली आहे.
ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. १० आणि ११ आगस्टला ब्रह्मपुरी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता एका आठवडयात दुसऱ्यांदा पूर आला आहे. किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली आले आहे. पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गाव अंधारात जाण्याची शक्यता आहे. बेटाळा फाट्यावरील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय पाण्याखाली आले आहे. या महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शीतपेयाच्या कारखान्यातसुद्धा पाणी घुसले आहे. नाना पटोले यांनी ट्विट करुन सरकारला कळकळीची विनंती केली आहे. सरकारने तात्काळ मदत आणि बचावकार्य येथे पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.