नदी स्वच्छ करा : ग्रीन हेरिटेजच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखलभंडारा : प्रदूषित वैनगंगा नदीचे शुध्दीकरण, पुनरुज्जीवन व्हावे यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जलसंधारण विभागाला निर्देश दिले आहे.वैनगंगा नदीचे पाणी नमूने नागपूर येथील जलगुणवत्ता प्रयोगशाळामध्ये तपासले असता ‘टोटल-कॉलीफॉर्म व फिकल-कॉलीफॉर्म’ या दोन घंटकांचे प्रमाण धोकादायक असल्याचे निष्कर्ष अहवालात दिसून आला. पाण्यासाठी फिकल-कॉलीफॉर्मचे अस्तित्व मानवी विष्ठा म्हणजे घरघुती सांडपाण्याचे संकेत देते हे पाणी पिण्यायोग्य नसून यापासून पीलिया, काविळ, डायरिया, किडनी, चर्मरोग व इतर आजार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. यावरुन नदीच्या पाण्याची शुध्दतेची कल्पना करता येईल. ही परिस्थिती बघता नद्यांचे पाणी आता पिण्यायोग्य राहिले नाही. ‘नीरी’च्या अहवालात ही नदीचे पाणी प्रदूषित असल्याचे समोर आले आहे.संस्थेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनाही याबाबत निवेदन दिले असता सांडपाणी विना प्रक्रिया वैनगंगा नदीमध्ये विसर्जित होत असल्याने नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे प्रभारी उप-प्रादेशिक अधिकारी कि. प्र. पुसदकर यांनी सांगितले. त्यांनी या पत्राची दखल घेत भंडारा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी व नागपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागनदीचे प्रदूषण नियंत्रणबाबतची सद्यस्थितीबाबत संस्थेला अवगत करण्याविषयी पत्र दिले आहे. भंडारा शहराकरिता पिण्याकरिता पाणी पुरवठा करण्याकरिता नगरपरिषद कडून शुध्दीकरण केंद्रावर प्रक्रिया करुन पाणी पुरविण्यात येतो. नदीचे थांबलेले प्रदूषित पाणी सोडण्यात येणार नाही तोपर्यंत नवीन पाणी मिळणार नाही हे खरे आहे, पण भंडारा येथे चार-पाच मोठे-मोठे नाले शहरातील प्रदूषित पाणी वाहून ते पण नदीत जाऊन मिसळतात, याकरिता नगरपरिषदेनेही ते रोखावे. एक मोठी जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यास पाठपुरावा गरजेचे आहे.या संस्थेतर्फे ना.नितीन गडकरी यांना नागपूर येथे भेटून नागनदी, वैनगंगा नदी शुध्दीकरणाबाबत निवेदन देऊन मागणी धरुन लावली. याकरिता नागपूर व भंडारा येथील संघटना व नागरिक ही सरसावले. नागनदीची स्वच्छता मोहीम सुरु झाली. ग्रीन हेरीटेज या सामाजिक संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळांना पत्र देण्यात आले. या मोहीमेला गती मिळाली. माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी हे पाठपुरावा करीत आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती याकरिता सहकार्य करीत आहे. संबंधित विभागांना त्यांनी निवेदने दिली. खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. हिवराज उके यांनी आंदोलन केले. याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व इतर संघटना याकरिता पुढे आले आहेत. (प्रतिनिधी)
वैनगंगा नदीचे प्रदूषण कायम
By admin | Published: May 26, 2016 1:41 AM