वरठीत गुन्हा दाखल : धान्य खरेदी-विक्रीसाठी घेतले कर्जलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय वाढावा यासाठी भंडारा येथील वैद्य दांपत्याने देना राष्ट्रीयकृत बँकेकडून सात कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यानंतर व्यवसाय डबघाईस आल्याचे कारण पुढे करून त्यांनी कर्ज थकीत ठेवले. यामुळे बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी वैद्य दांपत्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हे दाखल केल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील पुष्पक कॉम्प्लेक्स रहिवासी सोपान राघोबा वैद्य व शुभांगी सोपान वैद्य असे बँकेची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनी भंडारातील देना बँकेकडून सात कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. ते थकीत ठेऊन बँकेची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक अशोक निमजे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविला आहे.सोपान वैद्य यांची विश्वास अॅग्रो इंडस्ट्रीज प्रो राईस मिलींग प्रोसेसिंग व धान खरेदी विक्री मिल पाहुणी येथे आहे. शुभांगी वैद्य यांच्या नावाने श्रद्धा राईस मिल व प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे. दोन्ही दांपत्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या नावावर धान्य खरेदी विक्रीचा व्यवसायासाठी भंडारा येथील देना बँकेकडून सात कोटी रूपयांचे सीसी लिमीट घेतले होते. हा व्यवहार मे २०१४ मध्ये वैद्य दाम्पत्यांनी देना बँकेशी केला होता. यात सोपान वैद्य यांनी तीन कोटी तर शुभांगी वैद्य यांनी चार कोटी रूपयांचे कर्ज उचलले होते. या कर्जापोटी त्यांनी धान खरेदी, ट्रेडींग, मिलिंग करून आलेली रक्कम बँकेच्या कर्जापोटी परतफेड करणे असा नियमित व्यवहार करायचा होता. मात्र वैद्य दांपत्यांनी आॅगस्ट २०१६ पासून बँकेशी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला नाही. त्यामुळे बँकेने वैद्य दाम्पत्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना केल्या. तशा नोटीसही बजावण्यात आले. मात्र वैद्य दाम्पत्यांनी त्यांचा व्यवसाय डबघाईस आल्याने कर्जाची परतफेड करता येणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान या दाम्पत्यानी त्यांच्या मिलींगवर लाखो रूपयांचा धान्यसाठा खरेदी केल्यानंतर तो परस्पर विकून पैसा कमाविला. मात्र बँकेला पैसे परत न केल्यामुळे बँकेची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच बँकेचे व्यवस्थापक अशोक निमजे यांनी वैद्य दाम्पत्यांशी संपर्क साधला. मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेची सात कोटी रूपयांनी फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच सदर प्रकरणात एनपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. बँकेची रक्कम परत न केल्याप्रकरणी अशोक निमजे यांनी वरठी पोलीस ठाण्यात सोपान वैद्य व शुभांगी वैद्य यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांनी भादंवि ४०६, ४०९, ४२० कलमान्वये वैद्य दांपत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे हे करीत आहेत.
वैद्य दाम्पत्याने लावला बँकेला सात कोटींचा चुना
By admin | Published: June 07, 2017 12:22 AM