जवाहरनगर : भीमगिरी पहाडी पर्यटन स्थळ, राजेदेगाव जवाहरनगर येथे "समर्पिता रमाई आंबेडकर" जीवन कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंती समारंभासाठी विचार मंचावर प्रामुख्याने संघटक, वुमेन्स रेजिमेंट समता सैनिक दल, नागपूरचे मार्शल कांचन वासनिक व मार्शल चेतना हिराचंद गेडाम, सरपंच चंदा बागडे, देवेंद्र गेडाम, मुकेश गजभिये, बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मदनपाल गोस्वामी उपस्थित होते.
कांचन वासनिक यांनी रमाईंचा त्याग, समर्पण व आजच्या महिलांचे आंबेडकरी चळवळीमध्ये काय योगदान असले पाहिजे, यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. कुटुंबाला व समाजाला महिला कशा सामोऱ्या जाऊ शकतात, यासाठी गाव तिथे वुमेन्स रेजिमेंट समता सैनिक दलचे संघटन असावे, यावर भर देण्यात आला. तत्पूर्वी सकाळी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण व समता सैनिक दल शाखा, इंद्रानगर यांच्याद्वारे पथसंचलन, सॅलुटेशन आणि स्फूर्ती गीते गायली गेली. सकाळी दहा वाजता परिसंवाद समक रमाबाई आंबेडकर चळवळीमध्ये महिलांचे योगदान यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपात लास्ट ग्रुपअंतर्गत "झाली रमाई महान" यावर आधारित हिराचंद गेडाम व संच यांनी गीत सादर केले. सदर कार्यक्रमाला कवडसी, सावरी, कोंढी, सावरखंड, इंदिरानगर, राजेदेगाव व समस्त परिसरातील वुमेन्स रेजिमेंटचे कार्यकर्ते व सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते.
रुचिता अमोल मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री देवेन्द्र गेडाम व प्रीती माधव जीवने यांनी संचालन केले. ममता कैलास बावणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रोहिणी काळे, मीनल शैलेश जेठे, सरिता आदेश राऊत, सोनल मिलिंद साव, प्रियंका विनोद बागडे, विनंता मेश्राम, आशा सचिन मोटघरे, वंदना डोंगरे, शुभांगी निखिल चव्हाण, रुपाली रत्नदीप मेश्राम व नेहा जितेश मेश्राम यांनी सहकार्य केले.